सूरज दहाट | अमरावती : मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने अमरावतीच्या दर्यापूरमधील संतप्त शिवसेना (Shivsena) व शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात (District Agricultural Office) आंदोलन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुखाने आक्रमक होत विमा कंपनीच्या (Insurance Company) जिल्हा प्रतिनिधीच्या कानशिलात लगावली आहे.
गेल्या वर्षी अतिपावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पिकांचे नुकसान झालं होते. दर्यापूर येथे उडीद व मूग पीक पूर्णताः अति पावसामुळे वाया गेलं. तर शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकाचा विमा काढलेला होता. परंतु, एक वर्ष होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने संतप्त झालेले शेतकरी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाला अरबट यांनी पिक विमा कंपनीचे अधिकारी नितीन सावळी यांना जाब विचारला. यावेळी गोपाला अरबट यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने नितीन सावळी यांच्या कानशिलात लगावली.
तसेच, जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिका शिवसैनिक व शेतकऱ्यांनी घेतली. गेल्या दोन तासांपासून अमरावतीच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शिवसैनिक व शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला. परंतु, पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले, असे सांगण्यात येत आहे.