राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गेल्या महिन्याभरात पाचवेळा दिल्लीला गेले आहेत. आज पुन्हा सहाव्यांदा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषदेत केलं.
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावं लागलं नाही. शिवसेनेचे हायकमांड कायम मुंबईतच राहिले. मुंबईतच चर्चा झाली. दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. अमित शहांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली आहे. एका महिन्यात पाचवेळा यावं लागतंय, आपला मुक्काम दिल्लीत हलवतील की काय असं राज्याच्या जनतेला वाटू लागलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. अशातच शिंदे-फडणवीस सरकार येऊन महिना झाला असला तरी अजून मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच, शिंदे आपला मुक्काम दिल्लीत हालवतील का असा प्रश्ना राज्यांच्या नागरिकांना पडला आहे. असे सांगत खोचक टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.
यासोबतच, बंडखोरांना एखाद्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. शिंदे गटाला भाजपात सामिल व्हाव लागेल. शिंदे गटावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळेच ते सतत दिल्ली वारीवर असतात. शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार आहेत असा विश्वास व्यक्त करत राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं आहे.