ठाकरे गटाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी-शहादेखील देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशाची संपत्ती विकली. आज पुतीन यांच्या देशात काय घडत आहे? पुतीन यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी लष्करानेच पुतीनविरुद्ध बंड पुकारले. प्रिगोझिन यांनी जाहीर केले होते की, ”पुतीन देश संपवायला निघाले आहेत. पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे रशियात अराजक माजले आहे. आमच्याकडे हजारो लोकांची फौज आहे. आम्ही पुतीन यांना हटवणारच!” पुतीन हे स्वतःस बलाढय़ मानत होते. देशातील सर्व यंत्रणांचे मालकच बनून ते राज्य करीत होते. विरोधकांचा त्यांनी थेट काटाच काढला. सरळ ठार केले किंवा तुरुंगात डांबले. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो . पुतीन असो की मोदी , त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो . हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘ वॅगनर ‘ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे . पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘ वॅगनर ग्रुप ‘ एकत्र आला . हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे . पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने . पाटण्यातील ‘ वॅगनर ग्रुप ‘ ने तोच इशारा दिला! पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात करण्यात आलाय.
‘व्हाईट हाऊस’च्या पत्रकार परिषदेत देशातील लोकशाही, संविधान, अल्पसंख्याकांवरील हल्ले यावर विचारलेल्या एकाच प्रश्नाने मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली हे स्पष्ट दिसते. त्यामुळे वॉशिंग्टनचे त्यांचे फोटोसेशन काळवंडून गेले. असे सामनातून म्हटले आहे.