Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान पदाच्या खुर्चीच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवडून येण्यासाठी पहिल्या फेरीत सर्वाधिक मतं मिळाली आहेत. सुनक यांना 88 मतं मिळाली. सुनक यांच्यापाठोपाठ वाणिज्य मंत्री पेनी मॉर्डेंट यांना 77 तर परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 55 मते मिळाली. दरम्यान, माजी कॅबिनेट मंत्री जेरेमी हंट आणि विद्यमान कुलपती नदीम जाहवी यांनी पहिल्या फेरीच्या मतदानानंतर नेतृत्वाच्या शर्यतीतून माघार घेतली. पुढच्या फेरीत जाण्यासाठी आवश्यक ती 30 मतं मिळवण्यात त्यांना अपयश आले. आता ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रस आणि व्यापार मंत्री पेनी मॉर्डंट आघाडीवर आहेत.
सुनक हे या शर्यतीत आघाडीवर असून, त्यांना जास्तीत जास्त खासदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय. आपल्या प्रचाराची सुरुवात करताना 42 वर्षीय सुनक म्हणाले, "मी एक सकारात्मक मोहीम चालवतोय. माझ्या नेतृत्वामुळे पक्ष आणि देशाला कोणते फायदे मिळू शकतात यावर मी लक्ष केंद्रित केलं आहे." मतदानात स्पर्धा जिंकल्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
वादातही अडकले होते ऋषी सुनक
आज लोकप्रियतेच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असलेले सुनक कधीकाळ एका मोठ्या वादात अडकले होते. ब्रिटनमधील पार्टीगेट घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सन यांची खूप बदनामी झाली होती. त्याचा फटका सुनक यांनाही बसला होता. पार्टीगेट घोटाळ्याप्रकरणी सुनक यांनाही दंड ठोठावण्यात आला होता. कोविड-19 प्रोटोकॉल दरम्यान, मे 2020 मध्ये पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे फोटो आणि काही ईमेल लीक झाल्यानंतर हे प्रकरण तापलं होतं. बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीही मागितली आहे. या प्रकरणानंतर सुनक यांच्या लोकप्रियतेत घट झाली होती. पत्नी अक्षता यांच्यावरही कर बुडवल्याच्या आरोपांमुळे त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे.