वर्षाअखेरीस ज्येष्ठ नागरिकांचा मुंबई लोकलमधील प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठांसाठी राखीव डब्याचा समावेश असलेली उपनगरी रेल्वे गाडी डिसेंबरमध्ये मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मालडब्याची पुनर्रचना करून तो ज्येष्ठासाठी राखीव करण्यात येणार आहे. यामुळे डब्यांच्या संख्येत कोणताही बदल होणार नसला तरी ज्येष्ठांच्या आसन संख्येत दुपट्टीने वाढ होणार आहे.
लोकलमधून ज्येष्ठ नागरिक रोज हजारोच्या संख्येने प्रवास करत आहेत. मात्र त्यांच्यासाठी राखीव आसनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. यामुळे के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. सप्टेंबरमध्ये सुनावणीदरम्यान, ज्येष्ठांसाठी समर्पित डबा उपलब्ध होत नाही तोपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांना मालडबा वापरण्यासाठी मुभा द्या, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या.
उपनगरीय रेल्वेगाडीतील मालडब्यांचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या डब्यात करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून त्यानुसार रेल्वेगाडीत डब्यांच्या पुनर्रचनेचे काम सध्या सुरू आहे. मालडब्यात आवश्यक तो बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सोईस्कर ठरणाऱ्या डब्यासह पहिली लोकल डिसेंबरपर्यंत मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.