RBI ने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज नवीन पतधोरण जाहीर केले.
पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ ते १० ऑगस्टदरम्यान झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. चलनविषयक धोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केली होती. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढला आहे. ६ सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सध्या रेपो दर ६.५ टक्केच राहील. असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.