Sri Lanka : आर्थिक संकट, हिंसाचार आणि राजकीय गोंधळानंतर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून रानिल विक्रमसिंघेंनी (Ranil Wickremesinghe) शपथ घेतली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी घोषणा केली होती. त्यानंतर UNP नेते विक्रमसिंघे यांनी आज संध्याकाळी 6.30 वाजता शपथ घेतली. त्यानंतर हा समारोह पार पडला. रानिल विक्रमसिंघे हे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कोलंबोतील एका मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर ते आपली जबाबदारी स्वीकारतील. (Ranil Wickremesinghe is new PM of Sri Lanka)
श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया आणि विक्रमसिंघे यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चीन समर्थक महिंदा राजपक्षे यांच्यापेक्षा रानिल विक्रमसिंघे यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. रनिल पंतप्रधान झाल्यानंतर श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक चांगले होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, श्रीलंकेची अर्थव्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीमुळे डबघाईला आली आहे. नागरिकांना अक्षरश: खाण्यापिण्याच्या वस्तुसंसाठी तासंतास रांगा लावाव्या लागत आहेत. लोकांनी रस्त्यावर उतरुन या परिस्थितीसाठी सरकारला जबाबदार धरत निषेध केला. अनेक ठिकाणी यादरम्यान हिंसाचार झाला. देशातील लोकप्रतिनिधींना लोकांनी अक्षरश: मारलं. एकुण या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीला राजपक्षे परिवार जबाबदार असल्याची लोकांंची भावना होती. त्यानंतर या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता माजी पंतप्रधान आणि UNP नेते विक्रमसिंघे हे पंतप्रधान झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे 5 वेळा पंतप्रधान राहिले आहेत.