राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या '2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच झाला" असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकातून दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो'
छगन भुजबळांचा एका पुस्तकातून खळबळजनक खुलासा
'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’पुस्तकातून दावा
ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच-भुजबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022-23 सालामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. दोन्ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या होत्या. त्यानंतर आता महायुती सरकारमधील अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्याविषयी राजदीप सरदेसाई यांनी दावा केला आहे.
'अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका.. ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…' असं वक्तव्य केल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी केला आहे.
पुस्तकामध्ये नेमका काय केला दावा?
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या '२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ यांच्या पुस्तकातील 'हमारे साथ ईडी है' या शीर्षकाच्या प्रकरणात महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राजदीप सरदेसाई यांनी केला आहे.
"दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती', असे सांगून भुजबळ हे देशमुख यांच्या आरोपांचा दाखला देतात. 'तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल', असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही’
"अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली" राजदीप सरदेसाई यांनी छगन भुजबळांनी हे वक्तव्य केल्याचा दावा पुस्तकातून केला आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांची लोकशाही मराठीने फोनवर प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा आणखी काही खुलासे त्यांनी केले. पाहा व्हिडिओ-
मंत्री छगन भुजबळ काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन पुस्तकातील मजकूराविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.