महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी करून दाखवलं आहे. मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचे त्यांनी अल्टीमेंटम दिले होते. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाने हालचाली सुरु करत नवीन आदेश काढले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांची आज डीजीपींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करुनच या परवानगी दिला जाणार आहे.
ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर मनसेकडून प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर सामाजिक वातावरण गढूळ होऊ नये म्हणून पावले उचलण्यास सुरुवात झाली. मंदिर, मशिद, गिरीजाघर, चर्च किंवा इतर सर्व धार्मिक संस्थांना लाऊस्पिकर लावण्यासाठी परवानगी घेण्याचे आदेश आज गृहविभागाने जारी केली. ही परवानगी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देण्यात येणार आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेनंतर रविवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा खुलाशा केला. ते म्हणाले की, भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. हा विषय वर्षांपासून तसाच राहीलेला आहे. मला असं वाटतं की, तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत रहा. 3 तारखेला.. आता रमजान सुरू आहे. परंतू 3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, कळालं नाही आणि या देशातील कायदा, न्यायव्यवस्थेपेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.
नाशिकमध्ये अंमलबजावणी
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरेंच्या सभेनंतर सर्व धार्मिक स्थळांसह सर्व ठिकाणच्या भोंग्यासंबंधी परवानगी घेणे बंधनकारक केले. शिवाय तो आदेश तातडीने लागू केला. त्यानंतर आता राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर हा योग्य परवानीनेच करता येणार आहे, असा निर्णय आज झाला.
नाशिकचा पॅटर्न काय?
नाशिकमध्ये कुठलेही भोंगे लावण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील, असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेत. मशीद, मंदिर, गिरीजाघर, चर्च, गुरुद्वारा सर्वच धार्मिक स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. या साऱ्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यायला 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जिथे परवानगी नाही, तिथे पोलिसांच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय सर्व ठिकाणी नियमानुसार ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळण्याचा कडक बंधक करण्यात आला आहे.