लोकसभा निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार असून भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावं घोषित केली. परंतु, भाजपने मुंबईत धक्कातंत्र अवलंबले आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिलीय. उत्तर पूर्व इशान्य मुंबईसाठी मागील निवडणुकीत किरीट सोमय्या यांच्या जागेवर मनोज कोटक यांना संधी देण्यात आली होती. मात्र, आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता याच मतदार संघातून मिहिर कोटेचा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत कोणता उमेदवार असणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालाय. अशातच आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.दक्षिण मुंबईत कोणताही पेच नाही. जो उमेदवार असेल त्याच्यासाठी मेहनतीची पराकाष्टा करून त्याला आम्ही निवडून देणार, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.
नार्वेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा, हे एनडीएकडून जाहीर केलं जाईल. ज्याला संधी मिळेल त्याच्यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि त्या उमेदवाराला निवडून आणू. नवीन लोकांना संधी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून जे काम करतात त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल. महाराष्ट्र सरकार एअर इंडिया इमारत हस्तांतरित करत आहे, यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, मुंबई सारख्या शहरात जागेचा अभाव आहेच. १९६० पासून आतापर्यंत सरकारी कार्यालयांसाठी जागा आणि मंत्रालयाचा विस्तार या सर्व गोष्टींसाठी जागेचा अभाव होता. एअर इंडियाची जागा शासन घेत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. यामुळे प्रशासन योग्यरित्या चालेल आणि सामान्य माणसाचा फायदा होईल. शासनाचा हा चांगला निर्णय आहे.
जैन बांधव सातत्याने भारतीय जनता पक्षासोबतच राहिले आहेत. जैन समाजाचे अनेक पदाधिकारी भाजपशी जोडले गेले आहेत. मुंबईचा जैन समाज अत्यंत प्रभावशालीपणे भारतीय जनता पक्षाचं काम करत असतो. अशा कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी महत्वपूर्ण आहे. मुंबादेवी मंदिराच्या पुनर्विकासा संदर्भात महत्वाची बैठक झाली. भव्य दिव्य कॉरिडोअरसह मुंबादेवी मंदिराचं निर्माण होणार आहे, असंही नार्वेकर म्हणाले.