पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची रविवारी, 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब पोलिसांनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालासह 424 लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. आपल्या गाण्याच्या खास शैलीमुळे युवावर्गात सिद्धूचे मोठे चाहते होते. तर दुसरीकडे त्याच्यावर गन कल्चरला चालना दिल्याचा सुद्धा आरोप होत होता. अनेकदा सिद्धू हत्यारं घेऊन फिरताना दिसायचा, त्याच्या गाण्यामधून सुद्धा ते अनेकदा दिसून यायचं.
शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवालाने मानसातून काँग्रेसच्या तिकिटावर नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा 'आप'चे डॉ. विजय सिंगला यांनी 63,323 मतांनी पराभव केला. मानसा जिल्ह्यातील मूसा या गावचा असलेल्या मूसेवालाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना मानसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्याने, तत्कालीन मानसाचे विद्यमान आमदार, नजर सिंग मनशाहिया यांनी वादग्रस्त गायकाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचं सांगत पक्षाविरुद्ध बंड केले होते.
...म्हणून हत्या झाली असल्याची शक्यता?
गायक सिद्धू मुसेवालावर अकाली नेते विक्कू मिद्दुखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. मूसवाला पुढील आठवड्यात गुडगावमध्ये आपला शो करणार होता. गायक सिद्धू मूसेवाला अनेक वादात सापडला आहे. गन कल्चरबाबत त्यांला भरपूर विरोध झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो एके-47 या धोकादायक बंदुकीचं प्रशिक्षण घेताना दिसत होता. इतकंच नाही तर या व्हिडिओत त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारीही होते. या प्रकरणी पंजाब पोलिसांच्या 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.