मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला स्थगिती देत कांजूर येथील जागेसह इतर पर्यायांवर विचार सुरू केला. कांजूर येथील जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मागील महिन्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या नव्या सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. आजही 'आरे वाचवा' मोहिमेतंर्गत आरेत मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताबरोबरच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. शिंदे सरकारचे घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्यावतीने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती वर्तक यांनी दिली.