पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. सगळ्या स्तरातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 'सेवा पंधरवडा' शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे, मोदी यांच्या वाढदिवसाचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर देखरेख ठेवणे, ठरविलेले उपक्रम 'नमो ॲप' वर डाऊनलोड केले जातात की नाही, हे पाहण्यासाठी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे.
विशेषतः आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल या मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांवर यंदा विशेष भर राहणार आहे. यानिमित्त ‘सेवा पंधरवडा‘ कार्यक्रमात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असे १५ दिवस भाजपतर्फे देशभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल'च्या माध्यमातून स्वावलंबी भारताच्या उपक्रमाला चालना द्यावी, असे भाजपाने म्हटले आहे, याबाबतच्या ८ सदस्यीय राष्ट्रीय समितिचे नेतत्व करणारे राष्ट्रीय भाजप महासचिव अरुण सिंह यांनी देशभरातील भाजप शाखांना प्रदेशाध्यक्षांच्या नावे याबाबत एक पत्र लिहिले आहे.
त्यांनी या पत्रात नमूद केले आहे की, दी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या कोट्यवधी लाभार्थ्यांच्या शुभेच्छा संदेश पाठवावेत आणि त्यांची संख्या नमो अॅपवर अपलोड करवी. मोदींचे व्यक्तित्व आणि कार्य यावर देशभरात राज्य आणि जिल्हा स्तरावर चित्र व ध्वनीचित्र प्रदर्शने आयोजित करावीत. प्रत्येक जिल्हा-शक्यतो तालुक्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे, कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप आदी उपक्रम राबवावेत, करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोविड लसीकरण मोहिमेलाही गती देण्यास सांगितले आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पाणी हेच जीवन आदी मोहीमाही या काळात राबवाव्यात असे सांगण्यात आले आहे.
सेवा पंधरवड्यात पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्व, व्हीजन, दूरदृष्टीने व योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता, मोदी सरकारच्या योजना, धोरणे आणि उपलब्धी यावर चर्चा करण्यासाठी बुध्दिवादी वर्गासह विचारवंतांच्या परिषदा आयोजित केल्या जातील. २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त बूथ स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोंबरला बापूंची तत्त्वे, स्वदेशी, खादी, साधेपणा आणि स्वच्छता याविषयीही भाजपच्या वतीने विशेष मोहीमा राबविण्यात येणार आहे.