रायगड : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad) सोमवारी तारखेनुसार राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. यासाठी देशभरातून हजारो शिवप्रेमी, शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji raje) हे रविवारी संध्याकाळीच किल्ले रायगडावर दाखल झाले असून चित्त दरवाजा येथे त्यांचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.
दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासन नियमावलीत राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. यंदा मात्र कोरोना मुक्त वातावरण असल्याने मोठी गर्दी होत आहे. आलेल्या प्रत्येकाचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्वागत केले.
शिवराज्याभिषेक सोहोळ्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी राजे हे उद्या काय बोलणार, कोणती नवी घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गडावरील स्वच्छतेची जबाबदारी घेण्यात आली होती. 800 शिवभक्तांनी स्वच्छतेचा भार उचलला.