कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी विरोधकांवर विकासकामांमध्ये अडथळे आणल्याचा आरोप केला. तसंच कोणत्याही पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधाचं रुपांतर देशाच्या विरोधामध्ये न करणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. समाजवादी पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य हरमोहन सिंग यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त कानपूर येथे आयोजित एका चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “अलीकडच्या काळात विचारसरणी आणि स्वार्थाला देशहितापेक्षा जास्त महत्व देण्याचा ट्रेंड सुरु आहे. विरोधक सध्या सरकारच्या कामकाजात अडथळे आणतायेत, कारण ते सत्तेत असताना जे निर्णय त्यांना घेता आले नाही, ते निर्णय आता आम्ही घेतोय शातील जनतेला ते आवडत नाही.”
मोदी म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधाचं देशाच्या विरोधामध्ये रूपांतर करू नये ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. विचारधारांचं स्थान आहे आणि असलं पाहिजे. राजकीय महत्त्वाकांक्षाही असू शकतात, परंतु देश प्रथम येतो. मोदी पुढे म्हणाले, लोहियाजीं म्हणायचे की, समाजवाद हे समतेचं तत्त्व आहे. समाजवादाच्या पतनाने त्याचं विषमतेत रूपांतर होऊ शकतं, असा इशाराही ते द्यायचे. भारताला दोन्ही स्थितीमध्ये आपण पाहिलं आहे. समाज ही आपली संस्कृती आहे, संस्कार आहे आणि स्वभाव सुद्धा आहे. म्हणूनच लोहिया जी भारताच्या सांस्कृतिक क्षमतेबद्दल बोलत असत. त्यांनी रामायण मेळावा सुरू करून आपला वारसा आणि भावनिक ऐक्यासाठी मैदान तयार केलं होतं."