संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीला प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे अनुपस्थित राहिल्याने आमदार थोरात यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला.
थोरात म्हणाले, आम्हीही मंत्री राहिलो, महसूल मंत्री राहिलो, मात्र कधी शिर्डीचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना घेऊन बसलो नाही एवढी महत्त्वाची तालुक्यात वर्षातली एक टंचाई आढावा बैठक असताना देखील महसूलमंत्र्यांकडे प्रांतअधिकारी, तहसीलदार, बैठकीला जातात खेदाची बाब आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली. तसेच तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारा सुध्दा शिल्लक राहिला नसून, शेतकरी हवालदिल झाला आहे.