प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटके पासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याची सुनावणी आज ओरोस जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए एम फडतरे यांच्या कोर्टात सुरू असताना न्यायाधीश एम फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे, या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह, भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये, यांचे सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने नितेश राणेंचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना अडवलं. यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले.