राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद तर गेलंच, मात्र पक्ष वाचवण्याचं आव्हान देखील आता उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या लोकांकडून रोज एकमेकांवर आरोप होत आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या भाषणातून रोज आपल्या मनातली खदखद व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी आपल्याला दिलेल्या वागणुकीचे किस्से सांगितले आहेत. तर दुसरीकडे राणे कुटुंब उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नीकटवर्तींयांवर निशाणा साधणं सोडायला तयार नाहीयेत. माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
"संज्याने ठरवलंय उरलीसुरली ठाकरे सेना पण शिल्लक ठेवायची नाही, कोणालातरी शब्द दिला असावा." असा एकेरी उल्लेख करत शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे हे नेहमीच सेना नेत्यांवर अशाच भाषेत निशाणा साधत असतात. यापूर्वी त्यांनी भाजपसोबत शिंदे गटात असलेल्या दीपक केसरकरांवर देखील निशाणा साधला होता. "दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका." असं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं.