टीम इंडियाचे दिग्गज माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धूने हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पंड्याला भारताचा पुढचा कर्णधार बनवला पाहिजे. तर कसोटी क्रिकेटची कमान जसप्रीत बुमराहकडे सोपवली पाहिजे, असं सिद्धूनं म्हटलं आहे. सिद्धूच्या या प्रतिक्रियेमुळं क्रिडाविश्वात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
नवज्योतसिंग सिद्धू माध्यमांशी बोलताना म्हणाला, रोहित शर्मा अजूनही भारताचा कर्णधार आहे. परंतु, भविष्यात टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत विचार करावा लागेल. हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदासाठी असणारे सर्व गुण आहेत. त्याला वनडे आणि टी-२० चं कर्णधारपद दिलं पाहिजे. हार्दिक पंड्या भारताचं भविष्य आहे. रोहित शर्मा ३६-३७ वर्षांचा झाला आहे. आता तो आणखी काही वर्ष खेळेल.
तो खूप जबरदस्त कर्णधार आणि खेळाडू आहे. त्याला खेळताना पाहिल्यावर असं वाटतं की, वेळ थांबली आहे. पण तुम्हाला भविष्यात नवीन कर्णधारही तयार करायचा आहे. त्याला कसोटी क्रिकेटचा कर्णधार करा, असं मी म्हणत नाही, तो तुमचा उपकर्णधार आहे. जेव्हा रोहित शर्मा नव्हता, त्यावेळी त्याने जवळपास एक वर्ष टी-२० मध्ये कॅप्टन्सी केली होती. त्यामुळे हार्दिक पंड्या पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळेच बीसीसीआयने त्याला उपकर्णधार केलं आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी बीसीसीआय खूप रणनीती आखत असते, असंही सिद्धू म्हणाले.