महाराष्ट्रामध्ये भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजेच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे वेधले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवडणुकीआधी पोलिसांना ड्युटीवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण मुंबईतील पोलीस अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर न चुकता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे पोलीस आजारपणामुळे किंवा इतर खऱ्या कारणांमुळे ड्युटीवर दीर्घकाळ गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात शहरात कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पोलिस दल आवश्यक आहे.
मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 200 हून अधिक पोलिस कर्मचारी सध्या विविध कारणांसाठी रजेवर आहेत. जे महिनाभर ड्युटीवर हजर राहिले नाही त्यांना नोटीस बजावून ताबडतोब कामावर रुजू व्हायला सांगिण्यात आलं आहे. आतापर्यंत 200 मधून सुमारे 70 पोलिस कर्मचारी पुन्हा रुजू झाले असले तरी अनेकजण अजून रजेवर आहेत.