राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते राजन शिरोडकर यांचे मंगळवारी निधन झाले. राजन शिरोडकर हे गेल्या काही काळापासून आजारी होते. राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. कोहिनूर मिल प्रकरणात राजन शिरोडकर यांची ईडी चौकशी झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांचे ते वडील होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय असणारे राजन शिरोडकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
कोण होते राजन शिरोडकर?
शिवसेनेतील जुन्या फळीतील नेते म्हणून राजन शिरोडकर यांची ओळख होती. राजन शिरोडकर यांनी मनसेच्या स्थापनेपासून पक्षासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र काही कारणांनी त्यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजन शिरोडकर यांचे चिरंजीव आदित्य शिरोडकर हे शिवसेना ठाकरे गटात पुणे सह संपर्कप्रमुख आहेत. राजन शिरोडकर यांच्या निधनामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची दादर पश्चिम कुंभारवाडा येथे आज सायंकाळी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे.