Sanjay Shirsat Press Conference : नाना पटोले म्हणाले. आम्ही २८८ मतदारसंघात तयारी करत आहोत, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, काँग्रेसची वाढलेली ताकद किंवा त्यांचे निवडून आलेले खासदार, हे पाहता त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी ज्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते, त्यांना आता त्यांची पालखी घेऊन पुन्हा जावं. ते २८८ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतील, मग त्यांचा विजय होवो किंवा पराजय. आता जर उबाठा गटाच्या लोकांनी विचार केला नाही, तर भविष्यातील चित्र तुम्हाला पालखी वाहण्यापासून रोखणार नाही, असं मोठं विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
संजय शिरसाट पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळं उबाठाचं काय नुकसान होतंय, याचं चिंतन-मनन त्यांनी केलं पाहिजे. काँग्रेस मोठा भाऊ आहे, त्यामुळे उबाठा त्यांची पालखी वाहत आहे. त्यांना सांभाळून घेणं हे छोट्यांचं कामच आहे. आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. राज ठाकरे यावेळी स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, यावर बोलताना शिरसाट म्हणाले, राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी त्यावेळी स्पष्ट भूमिका मांडली होती की, माझा पंतप्रधान मोदींसाठी हा पाठिंबा आहे. ते विधानसभेला काय भूमिका घेतील, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.
अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांच्या वादाबाबात बोलताना शिरसाट म्हणाले, दानवे आणि सत्तारांचा वाद आणि मैत्री या सर्व जिल्ह्याने अनुभवलेलं आहे. त्यांच्याकडे गांभिर्याने पाहावं की टाईमपास म्हणून पाहावं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. जेव्हा जेव्हा हे समोर येतील, तेव्हा हे पाहावं लागेल, नक्की वाद आहे की मैत्रीतलं भांडण आहे. जेव्हा यांच्या भांडणाचा प्रश्न सीएम साहेबांच्या कोर्टात जाईल, तेव्हा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही संजय शिरसाट म्हणाले.