भूपेश बारंगे|वर्धा: आर्वी नगरपरिषदच्या सभागृहात संजय नगर येथील म्हाडाने बांधलेल्या संकुलातील ९६ गाळ्या संदर्भात आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हरीश धार्मिक उपविभागीय अधिकारी आर्वी, मनोजकुमार शहा मुख्याधिकारी आर्वी नगरपरिषद, रणजित पवार उपमुख्याधिकारी, मोहोड कार्यकारी अभियंता महावितरण, सौरभ निखारे सहायक रचना, गजानन गायकवाड सहायक प्रकल्प अधिकारी, बर्वे सहायक अभियंता महावितरण यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णायक बैठक संपन्न झाली. बैठकीतून स्थानिकांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आमदार दादाराव केचे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.
आर्वी येथील अनेक गोर गरीब बेघर कुटुंबांनी म्हाडा संकुलातील गाळ्यांचा ताबा घेऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरीही त्यांची नोंदणी नगरपरिषद आर्वीने नोंद करून रितसर तांत्रिक बाबींची पूर्तता केली नसल्याने ताबा केलेल्या कुटुंबांना टॅक्स पावती भेटत नसल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा केलेला नाही. त्यामुळे संकुलातील गाळे धारक रात्रीच्या वेळी आजच्या युगात कंदील व मेणबत्ती लावून जगत आहेत. तसेच उपलब्ध सार्वजनिक शौचालयाला नगरपरिषदने कुलुप ठोकून ठेवल्याने त्यांना शौचालयाचा वापर करता येत नाही. तसेच अनेकांनी गोरगरीबांच्या करीता बांधलेल्या संकुलातील काही गाळ्यात घर असुनही अतिक्रमण करून त्यात कडबा, कुटार, शेती साठी लागणारे साहित्य भरून ठेवले आहे. हि बाब स्थानिकांनी आमदार दादाराव केचे यांच्या लक्षात घालून दिली असता आमदार दादाराव केचे यांनी तातडीने संबंधितांसोबत निर्णायक बैठक लावली होती.
आमदार दादाराव केचे यांनी वस्तूस्थितीची इतंबूत माहिती बैठकीत हजर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना विषद केली. प्रत्येकांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे अशी आग्रही भुमिका आमदार दादाराव केचे यांनी ठेवली. आमदार दादाराव केचे यांनी महावितरण व नगरपरिषद यांच्यात समन्वय घातल्याने महावितरण कंपनीच्या वतीने विद्युत पुरवठा देण्यासाठी असलेल्या बाबींची पूर्तता आर्वी नगरपरिषद करून देणार असल्याची हमी आर्वी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी यांनी बैठकीत घेतल्याने गाळेधारकांना विद्युत पुरवठा लवकरच मिळणार आहे. तसेच ज्यांचे घरे असुनही संकुलातील गळ्यामध्ये अतिक्रमण केले आहे व त्यात कडबा, कुटार भरुन ठेवले आहे अश्यांना सुचित करून गाळे खाली करून देण्यासाठी निर्देशित करावे निर्देश देऊनही त्यांनी न ऐकल्यास सर्व वस्तूंचा लिलाव करावा अशी सूचनाही आमदारांनी देत आर्वीतील गोर गरीब बेघर कुटुंबांनाच संकुलातील गाळे मिळाले पाहिजे असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आर्वीतील गरजूंना हक्काचे घर उपलब्ध होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी गोर गरीब बेघर महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थितीसह विनय डोळे, संजय अंबोरे, राजाभाऊ वानखेडे, रवि गाडगे, नरेश गेडाम, निलेश देशमुख, सागर ठाकरे यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.