मणिपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये आज पुन्हा हिंसाचार घडला आहे. दोन गटात तुफान राडा झालाय. यावेळी अंदाधुंद गोळीबार देखील झालाय. या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे मणिपूरच्या सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मणिपूरमधील हिंसा अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. अजूनही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक बैठका घेतल्या. पण अजूनही हिंसाचार कमी झालेला नाही. विशेष म्हणजे तेंगनोउपल येथीन कुकी-जो या समाजाकडून भारत सरकार आणि यूएनएलेफ यांच्यात झालेल्या शांतता कराराचं स्वागत करण्यात आलं होतं. पण त्यानंतर लगेच आज दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात हिंसाचाराची मोठी घटना समोर आली आहे.
उपद्रवींनी जिथे हिंसाचार केला तो परिसर सुरक्षा दलांच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर होते. घटनेची माहिती मिळताच जवान परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना लीथू गावाजवळ 13 मृतदेह आढळले. हे मृतदेह परिसरातील नागरिकांचे नसल्याची माहिती मिळत मिळत आहे. हे सर्व बाहेरुन आले होते. आतापर्यंत एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी कोणतेही हत्यार मिळालेलं नाही. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.