येत्या ६ तारखेला इंडिया आघाडीची पुढची बैठक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बैठकीला जाणार नसल्याचं म्हटलंय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल मला काहीही माहिती नाही. आम्ही उत्तर बंगालमध्ये सहा-सात दिवस कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी जात आहोत. मला याबद्दल माहिती असती तर नक्कीच बैठकीला गेले असते. परंतु त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
इंडिया आघाडीची पाटणा येथे सर्वात पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बंगळुरुत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आघाडी घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार या पक्षांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पुढच्या बैठकांमध्ये चर्चा होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता दिल्लीत येत्या 6 डिसेंबरला बैठक पार पडत आहे. पण या बैठकीत विरोधी पक्षांमधील डॅशिंग नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.