10 जुनला दुपारी चार वाजता संपलेल्या मतदानाची मोजणी होण्यासाठी पहाटे चार वाजेपर्यंतची वाट पाहावी लागली. सर्व सहा जागांचे निकाल स्पष्ट झाले असून, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, काँग्रेसचे इम्राण प्रतापगढी तर भाजपचे पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर ज्या जागेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून होतं, त्या संजय पवारांचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपनं आपली खेळी यशस्वी केली. देवेंद्र फडणवीसांनी हे निकाल जाहीर होताच एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी "निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती... जय महाराष्ट्र !" असं ट्विट केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दोन वाजता एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी "सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra #रडीचा_डाव" असं म्हटलं आहे.
यशोमती ठाकूर यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, यापूर्वी देखील निवडणुका झाल्या, मात्र यापूर्वी कोणीच लोकशाहीला एवढं वेठीस धरलं नाही. जनता यांना कधीच माफ करणार नाही, अशा डावपेचांना कसं सामारं जायचं हे लोकांना माहिती आहे, मात्र भाजपला माफी नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
सुहास कांदे यांचं मत बाद ठरवल्यानंतर शिवसैनिकांकडून रोष व्यक्त केला जाऊ शकतो. तसंच इतर पक्षाचे देखील कार्यकर्ते तिथे आहेत. त्यांना बाजुला काढण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय. विधान भवनाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून, सर्व खबरदारी पोलिसांकडून घेतली जातेय.
मी सर्व नियमांचं पालन केलं असून, तरी जर आपल्यावर कारवाई करण्यात आली तर मी न्यायालयात जाईल असं कांदे यांनी लोकशाहीला सांगितलं आहे. माझ मत मी फक्त पक्ष प्रतोतांना दाखवलं असून, इतर कुणालाही मी ते दाखवलं नसल्याचं कांदे म्हणाले. तसंच राज्यात आणि देशात काय सुरु आहे, केंद्रीय यंत्रणांचा वापर कसा सुरु आहे हे सर्व आपल्याला माहिती असं कांदे म्हणाले.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यास संजय राऊत किंवा संजय पवार यांची जागा धोक्यात असणार आहे. त्यामुळे संजय राऊत किंवा संजय पवार यापैकी कोणाची जागा धोक्यात येणार हे आता पाहावं लागणार आहे.
निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण करून आणि व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित केला आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मत नाकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून, मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली. तर यशोमती ठाकुर आणि जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध धरलं जाणार आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा 11 जून रोजी वाढदिवस असतो. 10 जुनच्या दिवसभरात झालेली धावपळ आणि रात्रीपर्यंत निकाल न लागल्याने सर्व पक्षांचे नेते देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. तर तिकडे भाजपचे नेते मात्र चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा करताना दिसले.
शिवसेनेने आता या मुद्दयावरुन संताप व्यक्त केला आहे. या मतदानाची मोजणी आता थेट उद्या सकाळी 11 वाजता करा असं अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
देशभरात राज्यसभेच्या 56 जागांसाठी 10 जुन रोजी मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं. राज्यात देखील चार वाजेपर्यंत मतदान पार पडलं, त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत आधी राज्याच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. मात्र आयोगाने मतं अवैध ठरवण्याची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर भाजपचं शिष्टमंडळ मुक्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपने आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, रात्री साडेबारापर्यंत सुद्धा मतमोजणी सुरु झालेली नाही. आजवर राज्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची एक प्रथा होती, त्याला आता खंड पडलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक मानली गेली आहे.
राज्यसभा निवडणुकांच्या निकालांचं नेमकं काय होणार? निवडणूक रद्द होणार का? अवैध असल्याचा आरोप केलेली मतं रद्द होणार का? ती रद्द करायचं ठरलं तर नेमकी त्यासाठी प्रक्रीया काय असेल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत.