जमीन-नोकरी घोटाळा प्रकरणात सीबीआयने शनिवारी (११ मार्च) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले. मात्र, तेजस्वी यादव सीबीआयसमोर हजर होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, RJD नेते तेजस्वी यादव पत्नीच्या प्रकृतीमुळे सीबीआय मुख्यालयात जाणार नाहीत.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यानंतर तेजस्वी यादव यांच्या पत्नीला शुक्रवारी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जमिनीच्या बदल्यात झालेल्या घोटाळ्यामुळे लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढत आहेत. सीबीआयने यापूर्वी लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांची चौकशी केली होती. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांना समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी सीबीआयने तेजस्वी यादवला दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे.
संचालनालयाच्या पथकांनी शुक्रवारी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पाटणामधील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती.