गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. कसब्यात भाजपाला धक्का बसला आहे. कसब्याचे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.
काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ११ हजार ४० मतांनी विजय झाला असून हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. हा निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का समजला जातो आहे. कसब्यात 28 वर्षानंतर भाजपाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली . त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षबदल करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धंगेकर हे तब्बल ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात पराभव झाला होता. 2017 मध्ये काँग्रेस अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले.