Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

आदिवासींचे लढे अन् आंदोलन

Published by : Team Lokshahi

ऑगस्ट महिना हा अनेकार्थाने स्वातंत्र्याचा उत्सव असलेला महिना. ‘9 ऑगस्ट-क्रांती दिन’ छोडो भारतचा लगावलेला बुलंद नारा. ‘15 ऑगस्ट-स्वातंत्र्य दिवस’ आम्हा भारतीयांचा ‘राष्ट्रीय उत्सव.’ ‘9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस’ देखील नि ‘31 ऑगस्टला जन्मजात भटक्या-गुन्हेगार लोकांचा विमुक्त दिन’ तसा एका अर्थाने स्वातंत्र्य दिनच. या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ चाललेल्या लढ्यांमध्ये आदिवासी भटक्या-गुन्हेगार ठरवलेल्या जमातींचे काही योगदान आहे का? हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

आदिवासींचे लढे ज्या 1857च्या संस्थानिकांच्या उठावाला इतिहासकार राष्ट्रीय आंदोलनाचा पाया म्हणतात, त्याच्याही तब्बल 90 वर्षांआधीपासून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे बिगुल वाजले होते. उलगुलानचा नारा दिला गेला होता, हे अव्हेरता येणार नाही. ब्रिटिश सत्तास्थापनेनंतर येथील आदिवासींसोबत अनेक सशस्त्र लढे झाले, ज्याचे मुख्य कारण इंग्रजांद्वारा सामाजिक, आर्थिक आणि भूसांस्कृतिक जीवनात केलेला हस्तक्षेप हे होते. ब्रिटिशांनी वनांना सरकारी संपत्ती घोषित करून टाकले. सावकार, जमीनदार, वतनदार, महाजन इंग्रजांशी मिळून आदिवासींचे शोषण करीत. याचे परिणामरूप आदिवासी लोकसमूह आणि ब्रिटिशांमध्ये संपूर्ण देशात संघर्षाची ठिणगी पडली होती. भारतीय इतिहासात आद्यक्रांतिकारकत्व आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पायाबद्दल खूप संदिग्धता आहे. त्याबद्दल इतिहासकार भाष्य करतील. मी फक्त काही निरीक्षणे उद‌्धृत करतोय. ‘स्वातंत्र्यकोश’कार श्रीकृष्ण सरल यांच्या मतानुसार, स्वतंत्रता आंदोलनाचा परीघ हा 1757 प्लासी ते 1961 गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत असला तरी त्याचा भक्कम पाया मात्र देशभर उभी राहिलेली आदिवासींची आंदोलनेच म्हणता येईल. हे विधान कुणाला पटेल वा न पटेल; पण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचे ‘हम आदिवासीयों से नही लड सकते. ये लोग आजादी की लडाई हमसे भी पहले (1857) से लडते रहे है। आदिवासी ही भारत के सच्चे राष्ट्रवादी है।’ हे 1949 मधील झारखंडच्या आदिवासींना संबोधित करताना नेहरूंना उद्देशून केलेले विधान बरेच बोलके आहे.

इस. 1767च्या जंगल महालच्या खैरा, मांझी, भूमिज, धोलोंच्या पासूनची आदिवासी उलगुलानची शृंखला भारतीय इतिहासकारांच्या लक्षात कशी आली नाही, याचेच आश्चर्य वाटते. मध्य भारतात सकरागड भागात पहाडीया, मांझिया, संथाल, नायका, मुखीयांचे 1766 ते 1778 असे तब्बल 12 वर्षे सरदार रमणा अहिडीच्या नेतृत्वाखाली 1200 पहाडीया वीरांनी आरंभलेले ‘पहाडीया आंदोलन’, 1772 च्या दरम्यान संथाल, पहाडीया मिळून 20 हजाराहून अधिक आदिवासींचा सहभाग होता. ज्यात 8000 आदिवासी मारले गेले. अधिककरून महिला, मुलांची संख्या अधिक होती. हा पहिला मोठा विद्रोह होता, ज्यात संपूर्ण समुदायच नेतृत्व करीत होता. बंदूक, बनाम, तीर, भाले असे लढ्याचे रूप होते. 1770 मध्ये सुरू झालेला मुंडांचा ‘पलागु विद्रोह’ मुंडा नेता भूखनसिंह 1819 पर्यंत व्यापलेला आहे. 1780 ते 1790 पर्यंत चाललेले संथाल परगण्यातील वीर तिलका आणि मांझी यांच्या नेतृत्वातील ‘दामीन विद्रोह’. 1795 तमार विद्रोह, 1797 विष्णू मानकीच्या नेतृत्वातील छोटा नागपूर मुंडा विद्रोह, 1798 बिरभूम (बंगाल) बांकुडा चौर विद्रोह, 1798 मानभूम (ओरिसा) भूमिज विद्रोह… जणू काही इंग्रजांना चोहो बाजूंनी घेरले होते. अनेक वेळा इंग्रजांना पराभूतही व्हावे लागले. पण स्थानिक जमीनदार, वतनदार आदींची आदिवासींना सोडून इंग्रजांनाच मदत मिळत राहिली. ज्यामुळे शेकडो इंग्रज अधिकाऱ्यांबरोबरच जमीनदार, वतनदारांनाही ठार करण्यात आले होते. याच काळात केरळमध्ये 1793 ते 1812 पझसी राजाच्या नेतृत्वात कुरुची, वायनाड, कुरुमा आदिवासींचे वायनाड आंदोलन झाले. महाराष्ट्रात भागोजी नाईक (1818 ते 1857), वीर राघोजी (1830 ते 1848) यांनी अकोल्यापासून ठाण्यापर्यंत महादेव कोळी, भिल्ल, कातकरी आदी आदिवासींना आंदोलनात आणले. बागलानपासून पुणे, कारवार, बेळगावपर्यंत सह्याद्रीच्या कुशीत बेरड रामोशी उमाजी नाईकाने 1820 ते 1832 क्रांतीकुंडच पेटवले होते. उमाजी नाईकाविषयी 1820ला रॉबर्ट नावाचा अधिकारी आपल्या अहवालात लिहितो, ‘उमाजीचा आदर्श शिवाजी राजा आहे नि लोकही त्याला पाठिंबा देताहेत.’ तर 1832 ला कॅप्टन मॅन्किटोश हा इंग्रज अधिकारी म्हणतो, ‘उमाजी हा काही भटका वा दरोडेखोर नव्हे, शिवाजींप्रमाणे आपण राज्य मिळवावे ही त्याची जिद्द होती, तो दुसरा शिवाजी झाला असता.’ या विधानांवरून उमाजीच्या लढ्याची व्यापकता दृश्य होते.

जसजसा एका एका विद्रोहाचा बिमोड होत गेला, तसतशी शेकडो आंदोलने उभी राहात गेली. 1830 फुकन बरुआ, 1820-37 हो मुंडा, मानकीयांचा सिंहभूम विद्रोह, छोटा नागपूर भागात मुंडा उराँवांचे ‘कोल विद्रोह (1832)’, संथालांचा ‘हुल विद्रोह’, 1828-32 बुधा भगतचे ‘लरको आंदोलन’ झाले. या सर्वांवरचा कळस म्हणजे 1855 मध्ये ‘संथालक्रांती’ म्हणून इतिहासात नोंद झालेले ‘सिद्धू कान्हू विद्रोह’ ज्यात सिद्धू, कान्हू, चांद, भैरौंनी नेतृत्व केले. या आंदोलनात 30-35 हजारांहून अधिक आदिवासी सहभागी होते. 10 हजार शस्त्रधारी होते. यात 10 हजार आदिवासी कामी आले. पुढे इंग्रजांनी ‘द इंडियन रॉबीनहुड’ असे संबोधलेले तंट्या भील (1884-1889) निमाड परगण्यात. ‘उलगुलानचा’ नारा देणारा धरती आबा बिरसा मुंडा (1895-1900) मध्य भारत झारखंडमध्ये, तर मानगडच्या पंचक्रोशीत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भील, बंजारा आदी आदिवासींना लढ्यात खेचणारे गोविंद गुरुबंजारा (1883-1923) इथपासून नागासंग्राम आंग्लोखेताम युद्ध (1879) भुटीयालेच्यांपासून अंदमान निकोबारच्या जाखा, ओंगी, सेंटीगेली आदी आदिवासींपर्यंत लढत राहिले.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे