मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते जयंत मलैया हे 35 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेल्या आम आदमी पक्षाच्या (AAP) उमेदवार चाहत पांडे यांना मध्य प्रदेशमधील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे.
टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे या वर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीत सामील झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या यांच्या विरोधात पक्षाने चाहत यांना दमोहमधून उमेदवारी दिली.
कोण आहे चाहत पांडे?
अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तीने वयाच्या 17 व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-2, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोलसह अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. सध्या ती 'नाथ जेवर या जंजीर' या टीव्ही शोमध्ये महुआची भूमिका साकारत आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान चाहत पांडेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये चाहत पांडे ही 'लडका आँख मारे' या गाण्यावर नाचताना दिसली होती. तिच्या या व्हिडीओवर काहींनी नाराजी व्यक्त केली. तर, काहींनी कौतुकही केले होते.
मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनंतर, भाजपचे जयंत मलैया यांना 65 हजार 453 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे उमेदवार अजय टंडन यांना 35 हजार 315 मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बसपाचे उमेदवार प्रताप रोहीत असून त्यांना 2028 मते मिळाली आहेत. चौथ्या स्थानी आम आदमी पक्षाच्या उमेदवार चाहत पांडे यांना 1535 मते मिळाली आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मतदारसंघातील मतमोजणीच्या 21 पैकी 12 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.