जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. यावरच आता एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष गुणरत्न सदावर्ते यांनी उत्तर दिलं आहे. "अखंड भारताचे मार्गविधाते नथुराम गोडसे यांचा मी पाईक आहे. जरांगे पाटलांची सभा हे केवळ एका यात्रेचं स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात", असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?
आम्ही कुणाही पॉलिटीकल बॉसेसचे लॉयल डॉग नाहीत. असे लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात. जे आरक्षण दिलं ते फडणवीसांनीच दिलं. ही शरद पवारांची आगपाखड आहे. आजची सभा नापास, नाकाम सभा आहे. या सभेची चौकशी झाली पाहिजे, शरद पवारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
जरांगे पाटील यांची भाषा शिवराळ. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्याची, ही जातीची घोषणा नाही. ज्याप्रकारे पोलिसांना टार्गेट करण्यात आलं ही आगपाखड आहे. मला सायलेंट करण्यासाठी बोललं जातं, पण मी सायलेंट होणार नाही. जरांगेचे पॉलिटीकल बॉसेस वेगळे आहेत. जरांगेंनी त्यांच्या पॉलिटीकल बॉसेसला दाखवून दिलंय की ते किती लॉयल आहेत, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
दरम्यान,जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत गुणरत्न सदारर्ते यांच्यावर टीका केली. मराठा समाजाचं गुणरत्न सदावर्ते यांनी एकदा वाटोळं केलंय. मराठ्यांच्या विरोधात तेच कोर्टात गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्ते यांना समज द्यावी. सदावर्ते फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत. मराठा अंगावर घेऊ नका. याच मराठ्याने तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत हे विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सरकार येण्यामध्ये मराठा समाजाचा मोठा वाटा आहे, असंही ते म्हणाले.