कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार असून 40 टक्के निर्यातशुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला 550 डॉलर किमान निर्यात मूल्य असणार आहे. यावर आता बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, 3 महिन्यांपासून आम्ही कांद्याची निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय ऐकतोय. बऱ्याचवेळा साखर वाटप झालं. सत्कार झाला. नंतर कळालं की फक्त गुजरातचा पांढरा निर्यात करणार आहेत. महाराष्ट्राचे फक्त जाहीर होत आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्याला 3 महिने का लागतात? शेतकऱ्याचा कांदा राहिला तर त्याचा उपयोग आहे. शेतकऱ्याचे त्यांनी हाल केले, त्यांचे प्रचंड नुकसान केलेलं आहे. आता निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही. बैल गेला आणि झोपा केला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, पूर्णपणे देशाचे वातावरण बदलेलं आहे. शेतकऱ्याचे चार पैसे आले तर बाजारपेठेत पैसा येतो. तर व्यापार चालतो. शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. रोजगाराचा असेल, महागाईचा असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील. याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्याचा परिणाम दिसतो आहे. त्यांचे सरकार येणार नाही ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.