राज्यात पावसानं काल (बुधवारपासून) हाहाकार माजवला आहे. काही भागात नद्या - नाले भरुन वाहू लागले आहेत. नद्यांना पूर आला आहे. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.
पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीसंदर्भात माहिती जाणून घेतली. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.