मुंबई : सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आज आपलं मत व्यक्त केलं. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेचं प्रत्येकानं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्र धर्मासोबत, मराठी भाषिकांना न्याय देण्याच्या बाबतीत असलेली भुमिका राज ठाकरेंनी हिंदुत्वाशी समरस केली. त्यामुळे सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारुन मनसेने (MNS) हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला असेल तर तो चांगला आहे. आम्ही एकत्र येणार नसलो तरी, मनसेने भाजपच्या भूमिकेला अनुरुप भूमिका घेतली आहे असं मुनगंटीवार म्हणाले. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी थांबवणाऱ्यांनी पुर्विचार केला पाहिजे. तसंच त्यासाठी देवेंद्र फडणवीस (Degvendra Fadnavis) देखील राज ठाकरेंसाठी खासदार बृज भुषण सिंह यांच्याशी त्याबद्दल बोलतील असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
मुनगंटीवार म्हणाले की, राज ठाकरेंना अयोध्येत जाण्याचा अधिकार आहे. प्रभू रामाच्या दर्शनाला जाताना, जात, धर्म, विचार, पंथ काहीही आडवं येणार नाही. ज्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला आव्हान दिलंय, त्यांनीही पुनर्विचार करावा. आवश्यकता वाटली तर देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलतील असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसंच ही आपली वैयक्तीक भूमिका असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजप याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे महाराष्ट्रातील भाजपचे नेते राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर स्वागत करत, शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर तिकडे मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन उत्तर भारतीयांना त्रास दिला होता म्हणत भाजपच्याच खासदाराने राज ठाकरेंना आव्हान दिलंय. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेते याबद्दल काय भूमिका घेतता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बृज भुषण सिंह यांनी मात्र तिकडे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना बृज भुषण सिंह यांनी मात्र फडणवीसांना मला फोन करायला सांगा असं म्हणत काना डोळा केला होता. तसंच या प्रकरणात आपल्याला जे.पी.नड्डा आणि अमित शाह हे देखील फोन करणार नाही असा आत्मविश्वास बृज भुषण सिंहांना आहे. त्यामुळे आता 5 मे रोजी नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.