नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.
आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 2018-19 मध्येच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. 23 मे पासून एकावेळी फक्त 2 हजार मुल्याच्या 20 हजार रुपयांच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी तयार करण्यात येणार असून आरबीआयच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडल्या जाणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात 2 हजार रुपयांच्या नोटेबाबत माहिती दिली होती. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-22 मध्ये 2 हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात 2 हजार रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं.