अमझद खान | कल्याण : करोना काळाच्या दोन वर्षानंतर आज देशभरात दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. उत्साहात गोविंदा थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाला आहेत. दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी केली आहे. यातच डोंबिवली पश्चिमेकडील दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहिहंडी उत्सवाची सुरूवात कर्ण बधीर मुलांनी दहीहंडी फोडून केली आहे.
डोंबिवली मधील संवाद प्रबोधिनी शाळेतील मुलांनी 'हम भी किसीसे कम नहीं' आम्ही पण हंडी फोडू शकतो, असा संदेश या माध्यमातून दिला. या कर्ण बधीर मुलांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली आणि उत्सवात सहभागी झाले होते. कर्ण बधीर मुलांना दही हंडीचा आनंद लुटता यावा, यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्वराज्य दहीकाला उत्सवात पहिली हंडी फोडण्याचा मान या मुलांना देण्यात आला होता.