लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये राजकीय घमासान सुरु आहे. चंद्रपूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तानाशाहा सरकारने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना काय ट्रीटमेंट दिली आहे, हे काँग्रेस आणि देशाच्या जनतेला माहित आहे. सोनिया गांधींची तब्येत ठीक नसातनाही त्यांना ईडीच्या कार्यालयात तासनतास बसवून ठेवलं. हे काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातील जनता विसरली नाहीय, असं म्हणत पटोलेंनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं मोठं योगदान आहे. इंडिया आघाडी आणि मविआचा जागावाटपाचा तिढा सोडवला आहे. मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी सरकाराचा पराभव, भाजपचं पाणीपत करण्याचं ठरवलं आहे. केंद्रातलं सरकारी भ्रष्टाचारी आहे.
काँग्रसने सामाजिक न्यायासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला चंद्रपूरच्या सभेत खालच्या पातळीवर टीका केली. जाहीरनाम्याला मुस्लिम लीगशी जोडण्याचं काम काय? मुस्लिम लीगने या देशाला तोडलं, फाळणी केली. केंद्रीय तपास यंत्रणेंचा गैरवापर करुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली. या पक्षांचे ओरिजनल कार्यकर्ते हे विसरणार नाहीत. मविआ एकत्रितपणे काम करेन आणि राज्यात सर्वच सर्व उमेदवार जिंकतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.