CM Eknath Shinde Speech : शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळत आहे. पीक विमा कंपन्यांनी ७ हजार २०० कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांना दिले आहेत. ज्या लोकांना नाही मिळाले, त्यांनाही मिळतील. कुणीही वंचित राहणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ लोकांसाठी आपण एसटीचा प्रवास मोफत केला आहे. ६५ वर्षांखालील लोकांसाठी तिकीटाचे दर अर्धे केले आहेत. महिलांनाही बेस्टमध्ये अर्ध्या तिकीट दराची सूट दिली आहे. वयोश्री योजनेच्या माध्यमातून ३ हजार रुपये ज्येष्ठांच्या खात्यात जमा होणार. मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रेला जायचं असेल, तर त्यांचं सर्व नियोजन आपलं सरकार करेल. गाड्यांची व्यवस्थाही सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. वारकरी महामंडळातील काही लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच सरकार निर्णय पक्का करणार आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी संवाद साधताना बोलत होते.
वारकऱ्यांना संबोधीत करताना शिंदे म्हणाले,महामंडळाच्या माध्यमातून जे पायी वारी करतात, त्यांना विम्याचे, पेन्शनचे फायदे या योजनांच्या माध्यमातून होईल. वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही काही लोकांना पोटदुखी झाली. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला आहे. या दवाखान्यात मोफत उपचार होतील. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ४ मोठी शिबिरं आयोजित केली. ८ ते १० लाख लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे.
सरकारला आपल्या आरोग्याचीही चिंता आहे. मला अनेक वारकरी भेटले. ते म्हणाले, स्वच्छता चांगली आहे. पाणी चांगलं आहे. तिथे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काम करत नाही. मी तुमच्यातलाच वारकरी आणि सेवेकरी म्हणून काम करत आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो आहे. मग पांडुरंगाच्या वारीला येणाऱ्या भक्तांची गैरसोय कशी होऊ शकते, ही माझी जबाबदारी आहे.
ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो. तिथलं सर्व चित्र पाहिलं आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी अंमलबजावणी केली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयसीयू सुद्धा सुरु केला आहे. या दर्शन रांगेत लोक १८-२० तास थांबतात. वयस्कर लोक, महिला या रांगेत असता. त्यांची काय परिस्थिती होते, पांडूरंगाचं दर्शन घेण्यासाठी ते मागेपुढे बघत नाही. वीस तास रांगेत उभे राहतात. त्यांच्यासाठी सरकारने तिरुपती बालाजीच्या धरतीवर दर्शन रांग, मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १०३ कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घोषित केला आहे. तानाजी सावंत यांनी सांगितलं, या पंढरपूरमध्ये १००० बेडचं हॉस्पिटल सुरु करायचं आहे.