राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडून गेल्यानंतर राज्यात सध्या भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. 30 जुनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देेवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. 2019 साली भाजपच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता गेली, तेव्हापासून हा पराजय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अत्यंत जिव्हारी लागल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली आहे.
आगामी काळातील राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिका निवडणुका, तसंच आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची ही युती अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. 'राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती पटली नाही, उद्धव ठाकरे वेळ देत नाही, त्यांच्या आजुबाजूची लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही' अशी अनेक कारणं देत शिवसेनेतले तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाबाहेर पडले अन् भाजपसोबत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. राज्यात मागच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांपासूनच शिवसेनेमध्ये अस्वस्थतेच्या, नाराजीच्या लाटा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर या लाटा एवढ्या तीव्र झाल्या की, यामुळे शिवसेना (Shiv Sena) फुटली आणि परिणामी महाविकास आघाडीचं (MVA Government) सरकारच कोसळलं. त्यानंतर आता राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकार अस्तित्वात आलं. त्यामुळे आता भाजप समर्थक शिवसेनेला चांगलंच शिंगावर घेताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्याचे आरोप करत, त्यांना सळो की पळो करुन सोडणारे किरीट सोमय्याही यात मागे नाहीत.
शिंदेगटाचे आमदार सोमय्यांवर मात्र नाराज
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वक्तव्य करु नका अन्यथा भाजपची साथ सोडू असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे आताच थाटलेला भाजप आणि शिंदे गटाचा संसार विस्कटणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. "किरीट सोमय्यांमुळे भाजप शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र त्यांनी आता लक्षात ठेवावं की, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून बाहेर पडलो आहेतय मातोश्री हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर, प्रेम आहे. आज ते एकटे असले म्हणजे त्यांना कुणीही काहीही बोलेल असं होणार नाही. किरीट सोमय्या यांच्या तोंडाला लगाम लावला पाहिजे, वरिष्ठांनी सुद्धा याबद्दल विचार केला पाहिजे. जर किरीट सोमय्या असंच बोलत राहिले तर आम्ही सत्तेला, मंत्रीपदांना लाथ मारु" असं संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे.