दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री अटक केली. दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर न केल्याने ईडीने ही कारवाई केली. दरम्यान, केजरीवाल यांना दहा दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली होती. न्यायालयाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला. केजरीवाल यांना मागील वर्षापासून आतापर्यंत चौकशीसाठी दहावेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, केजरीवाल यांनी समन्सला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ईडीने कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीने केजरीवाल यांना अटक केल्याने आपकडून अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. केजरीवाल यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा आपचे नेते करत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा न दिल्याने त्यांच्या घरावर ईडीने झाडाझडती घेतली. दोन तासांच्या चौकशीनंतर गुरुवारी केजरीवाल यांना ईडीने अटक केली.