चीन-तैवानमध्ये सुरु असलेल्या संघर्षाला आता हिंसक वळण लागलं आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, चीनने तैवानला वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. चिनी सैन्यानं तैवानला 6 बाजूंनी घेरलं असून, समुद्रातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात झाली आहे. चिनी सैन्याने तैवानला पाण्याबरोबरच हवाई क्षेत्रातही घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विमानांची वाहतूक थांबवण्यात आली असून तैवानमधील काही बंदरंही बंद करण्यात आली आहेत.
चिनी सैन्यानं आपल्या लष्करी सरावाची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र तैवानने दावा केलाय की, चीनने आण्विक क्षमता असलेल्या डोंगफेंग क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला आहे. चिनी सैन्यानं मंगळवारी युद्ध सराव सुरू केला होता, गुरुवारी चीननं थेट हल्ले करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. ७ ऑगस्टपर्यंत हा सराव सुरु राहणार असल्याचं चिनी सूत्रांचं म्हणणं आहे. चीनने तैवान हा आमचाच भाग असल्याचा दावा केला असून, आतापर्यं तैवानने मात्र हा दावा फेटाळला आहे.
चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, लष्कराकडून करण्यात येत असलेला हा सराव हा तैवानच्या परिसरात केला जाणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा सराव आहे. भविष्यात तैवानला चीनमध्ये समावून घेता यावं यासाठी हा सराव केला जात आहे. त्याच वेळी, तैवाननेही त्यांचं सैन्य सतर्क ठेवलं असून, कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयारी जोरदार तयारी सुरु केली आहे. तैवानचं लष्करही चीनच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
गुरुवारी सुरू झालेला हा सराव रविवारपर्यंत सुरू राहणार असल्याचे चीनच्या सरकारी माध्यमांनी सांगितले आहे. या लष्करी सरावात चीनचे नौदल आणि हवाई दल सहभागी होत आहे. यादरम्यान पाणबुड्यांमधून थेट गोळीबार केला जात आहे. याशिवाय हवाई क्षेत्रातही क्षेपणास्त्रे डागली जात आहेत.