'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच झाला" असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा या पुस्तकातून दावा करण्यात आला आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिकिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, अशी कुठलीही मुलाखत मी दिलेली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर अनेक दिवसांपासून होत आहे. माझ्याबद्दल जर म्हणाल तर मला कोर्टाने महाराष्ट्र सदनमध्ये क्लिनचीट दिलेली आहे. ती आता नाही दिली ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांचे सरकार होते त्यावेळी दिली. कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांना आणि पवार साहेबांना पेढेसुद्धा दिलेलं आहेत. त्यामुळे मला परत तुरुंगात जायची भिती आहे. या सगळ्या गोष्टींचा मी इन्कार करत आहे.
आम्ही विकासासाठी आलो. आता 54 लोकांनी ज्या सह्या केल्या होत्या की आपण सरकारमध्ये गेले पाहिजे त्यांच्यावर काय ईडीची केस नव्हती किंवा आता जे काही आमच्याबरोबर आहेत त्यांच्यावर काय सर्वांवर ईडीची केस नव्हती. पण इथे आल्यानंतर आम्ही आपल्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. आजसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये याक्षणाला सुमारे 2 हजार कोटीची कामं सुरु आहेत. आम्ही जो सगळा निर्णय घेतला त्या निर्णयानुसार आम्ही या सरकारमध्ये सामील झालो. त्याचा निश्चितपणे विकासासाठी आम्हाला फायदा झालेला आहे आणि तो होतो आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता याच वेळेला का असं छापलं जात आहे हे मला कळण्याच्या पलिकडे आहे. निवडणुकीच्या या धामधूमीमध्ये फोकस चेंज करण्याचा उद्देश आहे की काय आहे याची काही कल्पना नाही आहे. पण लोकशाहीमध्ये आपापला त्यांना जो काही अधिकार आहे ते आपलं तो त्यांचा अधिकार चालवतात. माझं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण मी हे जे काही पुस्तक आहे ते वाचलेलं नाही. ते पुस्तक मी वाचेन आणि त्यात काय लिहिलेलं आहे काय नाही. आता सध्या 7 -8 दिवस जे आहेत अर्थातच माझा फोकस जो आहे हा जो निवडणुकीचा हा काय मी चेंज होऊ देत नाही. 7 - 8 दिवसानंतर निश्चितपणे चुकीचं जे जे काही असेल त्याच्याविरुद्ध जी मला कारवाई करावी लागेल ती सर्व कारवाई मी निश्चितपणे करणार आहे. असे छगन भुजबळ म्हणाले.