CSK vs PBKS : आयपीएल २०२४ चा ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात धरमशाला मैदानात रंगला. या सामन्यात सीएसकेनं पंजाबचा २८ धावांनी पराभव केला. त्यामुळे सीएसके गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सीएसकेनं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ विकेट्स गमावून १६७ धावा केल्या. परंतु, या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची पुरती दमछाक झाली.
पंजाबला निर्धारीत षटकांमध्ये ९ विकेट्स गमावल्यानं १३९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३० धावा केल्या. चेन्नईसाठी रवींद्र जडेजाने सर्वात जास्त ३ विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंगने २-२ विकेट घेतल्या. तर मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर अजिंक्य रहाणेला या सामन्यात सूर गवसला नाही. ९ धावांवर असताना रहाणेला अर्शदीप सिंगने बाद केलं. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने सावध खेळी करून २१ चेंडूत ३२ धावा केल्या. राहुल चहरच्या गोलंदाजीवर गायकवाड झेलबाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलने आक्रमक फलंदाजी करून १९ चेंडूत ३० धावा केल्या.
मिचेल हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तर कमालीचा फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मोईन अलीने २० चेंडूत १७ धावा केल्या. रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करून २६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ४३ धावांची खेळी केली.