मुंबई : मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील राजकारणाला एक वेगळं वळण दिलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरातील सभांनंतर आता मनसेचा (MNS) पुढचा कार्यक्रम देखील चर्चेचं कारण ठरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते 5 जुनला अयोध्येत जाणार आहेत. मात्र आता त्यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यातही वेगवेगळ्या अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा भाजप खासदार ब्रीजभुषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.
ब्रीजभुषण सिंह यांनी आता आक्रमक भुमिका घेतली असून, माफी मागितल्या शिवाय ते आयोध्येत पायच ठेवू शकत नाहीत असा इशारा ब्रीजभुषण सिंह यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी उत्तर भारतीयांना त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. तसंच राज ठाकरेंनी जर माफी मागितली नाही तर ते अयोध्येत कसेच येऊ शकणार नाही. असं कोणीच अजून जन्माला आलं नाहीये. कोणीही ठरवं तरी ते अयोध्येत येऊ शकणार नाही. ते विमानाने इथपर्यंत येतील, मात्र ते सैन्य घेऊन आले तरी त्यांना अयोध्येत आम्ही येऊ देणार नाही.
एवढ्यावरच न थांबता भाजप खासदार ब्रीजभुषण सिंह म्हणाले की, तिकडे राज ठाकरे आणि मनसे तयारी करत असतील तर आमचीही जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे काहीही झालं तरी माफी मागितल्याविना त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. ते जर सैन्य घेऊन आले तर लाखो लोकांचे शव ओलांडून त्यांना प्रवेश करावा लागेल असं म्हणत खुलं आव्हान ब्रीजभुषण सिंह यांनी दिलं आहे. राज ठाकरे साहेब असतील मुंबई साठी, ते आमच्यावर दबाव टाकून काही करु शकणार नाही. मुंबईच्या बाहेर तर ते कधी निघत नाहीत असं ब्रीजभुषण यांनी एका वाहिनीवर बोलताना सांगितलं.