ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य उत्पादकता-लिंक्ड बोनस देण्यास सरकारने बुधवारी मंजुरी दिली.
2021-22 या आर्थिक वर्षासाठी RPF/RPSF कर्मचारी वगळून अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) देण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे 11.27 लाख नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचार्यांना 78 दिवसांचे PLB देण्याचे आर्थिक परिणाम ₹ 1,832.09 कोटी असल्याचा अंदाज आहे. PLB भरण्यासाठी विहित केलेली वेतन गणना कमाल मर्यादा ₹ 7,000 प्रति महिना आहे. 78 दिवसांसाठी प्रति पात्र रेल्वे कर्मचारी देय असलेली कमाल रक्कम ₹ 17,951 आहे.