मुंबई : मुंबई (Mumbai) आणि हिरे व्यापार हे जुनं समीकरण आहे. मात्र आता हाच हिरे व्यवसाय (Diamond Business) आता गुजरातला (Gujrat) चालला आहे. आता या हिरे व्यापाऱ्यांना रोखण्याचं आव्हान राज्य सरकार समोर आहे. दिवाळीपर्यंत मुंबईतील 30 टक्के हिरे व्यापार गुजरातला जाण्याची शक्यता आहे. लोकशाहीने याचा आढावा घेतल्यानंतर धक्कादायक बाब समोर आलीय आहे. वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra kurla Complex) म्हणजे मुंबईतील बिझनेस हब आहे. मोठमोठ्या कंपन्या, त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस, अनेक उद्योग इथे आहेत. त्यातीलच एक डायमंड म्हणजे हिरे उद्योग आहे. लाखो लोक नोकरीसाठी बीकेसीमध्ये येतात, मात्र इथली मुख्य समस्या म्हणजे पुरेसी प्रवासी वाहतूक नसल्याने नोकरदारांचे होणारे हाल आहेत. याबद्दलचा विशेष रिपोर्ट लोकशाहीने केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाहतूक सुविधा पुरेशी नसल्याने दुसऱ्या राज्यात जाण्याची या कर्मचाऱ्यांची मानसिकता झालीय आहे. यापूर्वी हिरे व्यापार मुंबईतील ऑपेरा हाऊसमध्ये होता. तिथून बीकेसीमध्ये स्थलांतर झाला. त्यामुळे आता व्यवसाय कुठेही स्थलांतरीत होऊ शकतात, असा इशारा हे कर्मचारी देत आहेत. थोडक्यात हिरे व्यवसायासह बीकेसीमधील कर्मचारी वाहतुकीच्या असुविधेमुळे जेरीस आले आहेत. त्यामुळेच शेजारच्या राज्यात स्थलांतर होण्याची त्यांची मानसिकता झालीय आहे. यावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये हिरे व्यापाराची एक इकोसिस्टीम आहे. या इकोसिस्टीमला दर धक्का लागला नाही, तर हिरे व्यापार राज्याच्या बाहेर जाणार नाही. त्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, हिरे व्यापाऱ्यांचं संभाव्य स्थलांतर टाळायचं असेल, तर बीकेसीमधील वाहतुकीची सुविधा सुधारावी लागणार आहे. मुख्य म्हणजे रिक्षावाल्यांकडून होणाऱ्या भरमसाठ लुटीला देखील थांबवावं लागणार आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यासाठी काही विशेष पावलं उचलणार का? हे आता पाहावं लागणार आहे.