Raosaheb Danve On Abdul Sattar : अल्पसंख्यांक मंत्री अब्दूल सत्तार आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरुच आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दानवेंनी अब्दूल सत्तार यांना धारेवर धरलं आहे. माध्यमांशी बोलताना दानवेंनी सत्तारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. "अब्दुल सत्तार यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्यांचे सर्व कारनामे शोधले पाहिजे. सिल्लोड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कुणा कुणाच्या जमिनी बळकावल्या, कोणाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं, याचा शोध राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे", अशी मागणी भाजप नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
सिल्लोड येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांना काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया देत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. दानवे म्हणाले, कालच्या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यानी अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवणं हा सुरवातीचा प्रयोग आहे. पुढे - पुढे बघा काय होतं. अब्दुल सत्तार यांनी कालच्या लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात सर्व पक्ष गुंडाळून ठेवले, ते कोणालाही निमंत्रण देत नाही.
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी कालच्या कार्यक्रमाला बोलावलं नाही. अब्दुल सत्तार वारंवार म्हणतात, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यात मी एकही मराठा नेतृत्व आता शिलक्क ठेवणार नाही. दोन्ही जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेतृत्व संपुष्टात आणणार, असं अब्दुल सत्तार वारंवार म्हणतात, असा मोठा खुलासाही दानवे यांनी केला आहे.