ठाणे | निकेश शार्दुल : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्याने चांगलाच वादंग पेटलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ब्राह्मण समाज चांगलाच संतापला असून संपूर्ण राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येत आहेत. आज ठाण्यात परशुराम सेवा संघाच्या (Parshuram Seva Sangh) वतीने अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अमोल मिटकरी यांनी केलेले विधान अतिशय चुकीचे असून त्यांनी भर सभेमध्ये ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी परशुराम सेवा संघाचे शहराध्यक्ष अभिषेक समुद्रे यांनी केली. अमोल मिटकरी वारंवार ब्राह्मण समाजाच्या विरोधात भाषण करत असतात त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर परशुराम सेवा संघाच्या वतीने राज्यभरात साखळी उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
दरम्यान, आपले वादग्रस्त विधान बरोबर आहे असा दावा जर मिटकरी यांनी केला तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत असे खुले आव्हान देखील परशुराम सेवा संघाने दिले आहे.