महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. टेलिग्राम लिंकद्वारे 80 ते 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्रं लीक झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावरूनच राज्यात एकच खळबळ माजली आहे. गोपनीयतेचा भंग झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाली आहेत. विद्यार्थ्यांनी तात्काळ याप्रकरणी एमपीएससी आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान आता मनसेच्या विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आयोगावर टीका करत याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे?
प्रवेश प्रमाणपत्रं व्हायरल प्रकरणावर अमित ठाकरेंनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण आजचं एमपीएससी डेटा लीक प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसेच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी.
पुढे ते म्हणाले की, ‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल. अशी टीका त्यांनी यावेळी आयोगावर केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
एमपीएससीच्या गट क आणि गट ब ची परीक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे. परंतु, याआधीच परीक्षाचे हॉलतिकीट लिक एका टेलिग्राम चॅनेलवर लिक झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. एवढेच नव्हेतर या टेलिग्राम चॅनेलने 30 एप्रिल रोजी होणाऱ्या परिक्षेचा पेपर असल्याचा दावाही केला आहे. विद्यार्थ्यांचा अनेक खासगी डाटा त्या चॅनलकडे उपलब्ध आहे. याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी एमपीएससीकडे तक्रार दाखल केली आहे. तर ही बाब लक्षात घेऊन त्वरित यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.