बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी २४व्या आरोपीला अटक्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आकाशदीप कारजसिंह गिल (२२) याला पंजाबमधून अटक केली आहे. गुन्हे शाखेने पंजाब पोलिसांच्या मदतीने भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या एका गावात ही अटक कारवाई केली.
वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हे शाखेने एकूण २३ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. मूळचा पंजाबमधील फाजिल्का, पक्का चिस्ती गावातील रहिवासी असलेल्या आकाशदीप याला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती होती. हत्येच्या कटात तो सहभागी होता, असा पोलिसांचा आरोप आहे. अन्य अटक आरोपींच्या चौकशीत आणि गुन्ह्याच्या तपासात आकाशदीप याचे नाव उघड झाले.
त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमध्ये दाखल होऊन पंजाब पोलिसांच्या मदतीने आकाशदीप याला जेरबंद केले. अटकेनंतर आकाशदीप याला पंजाबमधील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथील न्यायालयाने त्याला मुंबईत आणता यावे यासाठी तीन दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली होती. आकाशदीप याला मुंबईत आणण्यात आले असून त्याला रविवारी मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.